जरांगेच्या पदयात्रेतील लाखो मराठयांची नगरकरांकडून सेवा अहमदनगर, ः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा रविवारी (दिनांक २१) रात्री बाराबाभळी (ता.नगर) येथील मदरसा परिसरात मुक्काम होता. मिंडसांगवीपासून येथे येण्यापर्यत ठिकठिकाणच्या स्वागतामुळे आंदोलकांना मुक्काम गाठण्यास सहा तासाचा उशिर झाला. रात्री उशिरापर्यंत या दिंडीने करंजी घाटही ओलांडला नव्हता. मात्र, मध्यरात्रीपर्यंत त्यांची हजारो समाजबांधव सभास्थळी प्रतीक्षा करीत होते. आज (सोमवारी) नगर शहरापासून खराडी बायपास (पुणे) इथपर्यत जागोजागी स्वागत झाले. अंदोलकासाठी जागोजागी पाणी तसेच नाष्ट्याची सोयही करण्यात आली आहे. सुप्यात अंदोलकांना दुपारच्या जेवनाची सोय केली होती, मात्र सुप्यात जायला सांयकाळचे सहा वाजले, त्यामुळे आजच्या पुण्याजवळील मुक्कामी ठिकाणी पोचायलाही उशिर झाला. मुंबईकडे जाणारी मनोज जरांगे पाटील यांची मुंबईकडे जाणारी पदयात्रा सकाळी साडनऊ वाजता बाराबाभळी येथून निघल्यानंतर नगर- सुपा- शिरुर घोडनदी रस्त्यावर केडगाव, चास, कामरगाव, सुपा, वाडेगव्हाण, गावांत पदयात्रेचे तसेच मनोज जरांगे यांचे जोरदार स्वागत केले. रस्त्यावरील प्रत्येक घर, दुकान आणि झाडांवर भगवे झेंडे लावले होते. घरासमोर स्वागताची रांगोळी काढण्यात आली होती. अहमदनगर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने भोजन आणि निवास व्यवस्था करण्यात आली होती. सभा आणि निवास व्यवस्थेच्या परिसरात जेवणाचे स्टॉल लावण्यात आले होते. पाच ते दहा गावातील व्यक्तींनी एकत्र येऊन जेवणाची व्यवस्था केली होती. विविध संस्थांच्या वतीने ही जेवणाची व्यवस्था होती. लापशी, भात, आमटी, मसाले भात, पुरी-भाजी असे वेगवेगळे खाद्यपदार्थांचे स्टॉल ठेवले होते. जागोजागी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटल्या जात होत्या. या ठिकाणी सायंकाळपासून खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले होते. रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येकाला जेवण करण्याचा आग्रह केला जात होता. बाराबाभळी येथील मुक्कामी नगर तालुक्यासह परिसरातील गावागावातून महिलांनी ज्वारी, बाजरीच्या भाकरी, चपात्या तयार करून दिल्या होत्या. प्लॅस्टिकच्या डब्ब्यांमध्ये बेसन, भाजी, आमटी, चटणी, लोणचे असे पदार्थ आणून देत होते. नगर- पाथर्डी रस्त्यावर बाराबाभळीच्या मदरसाच्या मैदानाजवळ स्टॉल लावले होते. मदरसा परिसरात थांबलेले बांधवही खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत होते. नगर तालुक्यात फडक्यात बांधून लोकांनी भाकरी आणल्या होत्या. जिल्हा सकल मराठा डॉक्टर आणि औषध विक्रेते संघटनेने आंदोलकांसाठी तीन ठिकाणी आरोग्य तपासणीची व्यवस्था केली होती. कार्डियाक रूग्णवाहिकेसह विविध रूग्णालयाच्या ३० ते ४० रूग्णवाहिका वेगवेगळ्या अंतरावर उभ्या होत्या. विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकही तैनात होते. समवेत औषधेही ठेवण्यात आली होती. अहमदनगर शहरात प्रचंड गर्दी झाल्याने नगरमधून पदयात्रेला बाहेर पडण्याला पाच तासाचा कालावधी लागली. दुपारी तीन वाजता भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पन करुन प्रभू श्रीरामांना अभिवादन केले. त्यानंतर केडगाव मार्गे सुप्याकडे मार्गस्थ झाले. मात्र केडगावातच चार वाजले होते. जागोजागी लोकांची गर्दी असल्याने सुप्यात पोचायला सहा वाजले. पदयात्रेत सुमारे दहा हजारापेक्षा अधिक वाहने सहभागी झाली होती. ———— मदरशाकडून आंदोलकांना `दावत’ बाराबाभळी (ता.नगर) येथील जामिया मोहम्मदिया मदरशाच्या विश्वस्थांनी मराठा आंदोलकांची आज मेहमान नवाजी केली. त्यांच्यासाठी २५ हजार पुरी-भाजीच्या पाकिटांचे वाटप करून पाहुणचार केला. मदरशाचे विश्वस्थ, शिक्षक आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या लोकवर्गणीतून २५ हजार पुरी-भाजी-मसाले भाताची पाकिटे तयार केले. मदरशाचे ३५ शिक्षक आणि २५० विद्यार्थी हे पाकीट वाटप करीत होते. मदरशामधील एका स्वतंत्र इमारतीमध्ये आंदोलकांमधील महिलांच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलनात सहभागी महिलांना सुविधा देण्यासाठी विश्वस्थ आणि शिक्षकांच्या कुटुंबातील महिलांनीही मदतीसाठी तेथे थांबून स्वयंसेवकांची भूमिका पार पाडली |