अहमदनगर,ः नगर येथे होत असलेल्या महासंस्कृती महोत्सवात यंदाही महिलां बचतगटांनी तयार केलेले साहित्य, शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीसाठीचा कृषी महोत्सव होत आहे. मात्र महोत्सवाची वेळ चुकली आहे. शेतमाल खरेदीसाठी आलेल्यांना बहुतांश शेतमाल खरेदीसाठी महोत्सवात उपलब्ध नसल्याने आल्या पावली परत जावे लागत असल्याचे पहायला मिळत आहे. आयोजकाच्या मनमानीमुळे महोत्सवात सहभागी झालेल्या शेतमालाच्या व्यतिरिक्त इतर स्टॉल धारकांनाही पुरेशा प्रतिसादा अभावी विक्री होत नसल्याने चिंता लागली आहे
शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल थेट विक्री करता यावा यासाठी राज्यभर कृषी महोत्सव घेतले जात आहेत. या संकल्पनेची सुरवातच २००६ साली नगर जिल्ह्यातून झाली. नगर जिल्ह्यात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य सरकारने कृषी विभागाच्या मदतीने राज्यभर महोत्सव घेतले जाऊ लागले. ज्या जिल्ह्याने या उपक्रमाची सुरवात केली, त्याच नगर जिल्ह्यात गेल्यावर्षीपासून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या हट्टापायी कृषी महोत्सव स्वतंत्र घेण्याएवजी सर्व यंत्रणांना एकत्र करुन कार्यक्रम घेत कृषी महोत्सव मोडीत काढला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही महासंस्कृती नावाने हा महोत्सव होत आहे. यंदा लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम घेतला जात असल्याचे दिसत आहे. मात्र लवकर महोत्सव घेण्याच्या घाईत सफल उद्देश होताना दिसत नाही
कृषी महोत्सवाला गेल्या अनेक वर्षापासून चांगला प्रतिसाद मिळतो. येथे शेतकरी ग्राहकांना शेतमालाची थेट विक्री करतात. खास करुन ज्वारी, बाजरी, गहु, तांदुळ, वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्याची खरेदी करतात. यंदा अजून ज्वारीची काढणी सुरु आहे. गव्हाला दहा ते पंधरा दिवसाचा अवधी आहे. हरभऱ्यासह अन्य कडधान्यालाही बाजारात यायला काही अवधी आहे. मात्र महोत्सवाचे नियोजन स्वतःकडे घेण्याची घाई झालेल्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या हट्टामुळे कृषी महोत्सवात धान्य खरेदी करण्यासाठी आलेल्या बहुतांश लोकांना धान्य खरेदी करता येत नाही. अलिकडे ज्वारी, बाजरीला मागणी वाढली आहे. त्यासह नव्या वर्षातील गव्हाची खरेदी करण्याची आशा बाळगून असलेल्या लोकांचा येथे हिरमोड होत आहे. आधीच महोत्सवाची पुरेसी प्रसिद्धी नाही, त्यात धान्यही पुरेसे उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. याबाबत मात्र कोणीही बोलायला तयार नाही.
————