प्राचीन भारताचा इतिहासात काही स्त्रियांची नावे येतात. वैदिक परंपरेतल्या मैत्रेयी,गार्गी ते बौद्ध संस्कृतीतल्या आम्रपाली पर्यंत.मध्ययुगात परकियांच्या आक्रमणामुळे स्त्री वर्गावर बंधने घालण्यात आली.महाराष्ट्राचा विचार केला असता नेमक्या ह्याच काळात महाराष्ट्राचा मनू बदलला.. Know chhatrapati Sivaji Maharaj Mother Rajmata Jijau Biography
शिवछत्रपतींचे अवघे आयुष्य म्हणजे महाराष्ट्राचा स्वभावधर्म .मग त्यात महाराजांचे “स्त्रीदाक्षिण्य” “न्यायप्रियता” नैतिकता सर्वच आले.जरा अधिक विस्ताराने विचार केला असता सहज दिसून येईल कि शिवछत्रपतींचा -राजश्री सिऊबाराजे ते छत्रपती श्री राजा शिवाजी हा प्रवास जिजाऊआईसाहेबांच्या भक्कम आधारावर झाला.भोसले-जाधवराव ह्या दोन्ही घराण्यात राजकारण होतेच पण वारश्याचा उपयोग “स्वराज्यलक्ष्मी “म्हणून प्रसन्न करण्यास जर कुणी केला असेल त्या म्हणजे जिजाऊआईसाहेब….
महाराष्ट्राच्या दोन छत्रपतींच्या स्वभावावर जिजाऊआईसाहेबांची छाप स्पष्ट दिसते.राधामाधवविलासचंपू ह्या काव्यग्रंथाच्या लेखकाची जयराम पिंडे प्रतिभा बहरली ती अवर्णनीय अशीच..
जशी चंपकेशी खुले फ़ुल्लजाई ।
भली शोभली ज्यास जाया जिजाई ।
जिचे किर्तीचा चंबू जंबूद्विपाला ।
करी साऊली माऊलीसी मुलाला ।
शहाजी महाराजांच्या धामधुमीला हि जिजाऊआईसाहेब धैर्याने सामोर गेल्या.महाराजांनी पोरसवदा वयात रांझेकर पाटलाला केलेल्या शास्तीच्या निर्णयात आईसाहेबांची शिकवण स्पष्ट दिसते..आग्रा कैदेत हि स्वराज्याची इंचभर जमिन न गमवता रांगणा स्वराज्यात आला…अफजल वधाच्या प्रसंगात “संभाजीचे ऊसने फेडणे आहे “ह्या एका वाक्यात एक दुखावलेली आई स्पष्टपणे जाणवते..अज्ञातदासानी पोवाड्यात लेकराच कौतुक केलं म्हणून त्याला सोन्याचा तोडा घालणारी वत्सल माऊली दिसते…महाराजांनी मुधोळचे घोरपडे ज्या प्रथमिक कारणामुळे उद्धवस्त केले त्या पतीच्या अपमानाचा सूड हि छत्रपतीस प्रेरणा आऊसाहेबच होत्या…
पाषाणच्या पाटिलकीच्या कथल्यात कोन्हेर रुद्र ह्या देशाधिकरीस महाराज म्हणतात .”स्वामी धाकुटपणापासून या देशात आहेत; मिरासदार कोण ?गैर मिरासदार कोण हे जाणताती;माणसाचे माणूस वळखतात.” महाराजांच्या धाकुटपण ते थोरपण हा प्रवास आईसाहेबांच्या आईपणाच्या कर्तुत्वाचे पर्व आहे.”माणसाचे माणूस वळखतात” ह्या माणूस जोखण्याची प्रक्रिया हि जिजाऊआईसाहेबांनीच घडवली.
जिजाऊआईसाहेबांच्या कर्तुत्वाचा प्रभाव भोसल्यांच्या घराण्यात तीन पिढ्यात दिसतो महाराणी येसूबाई,महाराणी ताराबाई,करवीर राजमाता जिजाबाई हि महाराष्ट्रातल्या जिजाऊपर्वाची अस्सल उदाहरणे आहेत…
महाराजांचे चरित्रकार म्हणतात”शिवाजी आईच्या अर्ध्या वचनात होता ” त्या अर्ध्या वचनाने पूर्ण महाराष्ट्र घडवला,लेकी बाळींची अब्रू जपली.आमच्या मर्दानी मनाच्या कोंदणात वसलेल्या ह्या मराठ्यांच्या मातृदेवतेस जयंती निमित्त विनम्र अभिवादन…