महाराष्ट्रामध्ये प्रगतशील आणि सर्वांगीण विकासित असलेल्या तालुक्यांमध्ये संगमनेर तालुक्याचा समावेश होतो. किंबहुना बारामती पाठोपाठ संगमनेरचा अग्रक्रमाने उल्लेख होतो. संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक आणि विकासातून झालेली प्रगती ही एका दिवसात झालेली नाही तर 1985 पासून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या अथक आणि अविश्रांत परिश्रमातून निर्माण झाली आहे. म्हणून या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे खरे शिल्पकार हे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात हे आहेत.
Sangamner taluka is among the progressive and comprehensively developed talukas in Maharashtra. In fact, it is mentioned prominently, second only to Baramati. The progress achieved in Sangamner taluka through educational, social, and economic development has not happened overnight, but is the result of the tireless and relentless efforts made by Loknete Balasaheb Thorat since 1985. Therefore, the true architect of the all-round development of this taluka is Hon. Balasaheb Thorat, a member of the Congress National Working Committee and a senior leader of Maharashtra, who also served as the Revenue and Agriculture Minister.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांचा वारसा घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राजकारणात प्रवेश केला. दुष्काळी तालुक्याला विकसित तालुका बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि 1989 मध्ये प्रथमतः भंडारदर्याच्या हक्काच्या पाण्यासाठी तीव्र लढा दिला. या संघर्षातून संगमनेर तालुक्याला 30 टक्के हक्काचे पाणी मिळाले. पाणी म्हणजे जीवन या अर्थाने यापुढे काम करताना त्यांनी तालुक्यामध्ये पाईप लाईनचे जाळे निर्माण केले. त्यामधून शेती फुलली.
1991 ते 95 या काळामध्ये कृषी व्यवसायाला पूरक अशा दूध व्यवसाय वाढीसाठी गावोगावी संस्था स्थापन केल्या. संकरित गाईंच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला. याचबरोबर गावोगावी पतसंस्थांचे जाळे निर्माण केले. याच कार्य काळामध्ये जलसंधारणाचे खूप मोठे काम होऊन प्रत्येक गावात ओढ़े, नाले या ठिकाणी कोल्हापुरी व दगडी बंधाऱ्यांचे जाळे निर्माण झाले. गावोगावी विद्यालय निर्माण होऊन शिक्षणाची मोठी सुविधा निर्माण झाली.
आरोग्य, शिक्षण,शेती,सहकार अशा सर्व माध्यमातून तालुका पुढे जात असताना तळेगाव सह दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले. 1999 मध्ये पाटबंधारे राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनंत अडचणीवर मात करून निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. हे ऐतिहासिक काम पुढील अनेक पिढ्यांसाठी वरदान ठरणारे ठरले आहेत. आज संगमनेर तालुक्यात निळवंडे धरणाच्या उजवा व डावा कालव्यातून पाणी येत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली आहे. दुष्काळी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आल्याने स्वप्नपूर्ती झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. याचबरोबर या कामात मदत करणाऱ्या सर्वांचे प्रति कृती कृतज्ञता सुद्धा या लोकनेत्यांनी व्यक्त केली.
संगमनेरच्या जनतेचा मोठा पाठिंबा आणि नेतृत्वाचा विश्वास या बळावर राज्यात महसूल मंत्री प्रदेशाध्यक्ष, कृषीमंत्री,शालेय शिक्षण मंत्री,रोजगार हमी मंत्री अशी विविध मंत्रिपदाचे खाती सक्षमपणे सांभाळताना या सर्व खात्यांना बाळासाहेब थोरात यांनी लोकाभिमुख व कार्यक्षम केले. आपल्या कामातून ठसा उमटवत राज्यभरात आदर निर्माण केला.
याचबरोबर स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी अडचणीच्या काळात काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली. राजकारण हे सर्वसामान्यांच्या विकासासाठी करायचे असते सत्तेसाठी नाही. हा विचार घेऊन लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी त्यांनी काम केले. त्यांच्या याच कामाची राष्ट्रीय पातळीवर नोंद झाली आणि काँग्रेसच्या महत्त्वाच्या 21 नेत्यांच्या यादीमध्ये संगमनेरच्या या सुपुत्राने आपला सन्मान मिळाला.
संगमनेर शहर आणि तालुका हे विकासाचे आणि प्रगतीचे मॉडेल राज्यासाठी दिशादर्शक ठरले आहे. आज सहकार, शिक्षण,समाजकारण, बाजारपेठ, बँकिंग ,शांतता ,सुव्यवस्था, वैभवशाली इमारती आणि सातत्यपूर्ण विकास हे एका दिवसात झालेले नाही तर त्यासाठी मागील ४० वर्षे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अविश्रांत काम केले आहे.
आणि त्या माध्यमातून देवकौठे ते बोटा असा 100 किलोमीटर लांबी असलेला विस्तीर्ण संगमनेर तालुका समृद्ध केला आहे. संगमनेरच्या बँकिंग क्षेत्रात सुमारे १० हजार कोटींच्या ठेवी आहेत. तर शिक्षणामध्ये गुणवत्ता असल्याने सर्व महाविद्यालय शहरात आहेत. तालुक्यातून दररोज साधारण ९ लाख लिटर दूध उत्पादन होत असून १५ लाख अंडी निर्मिती होत आहेत. मोठी आर्थिक उलाढाल आणि आर्थिक संपन्नता ही या तालुक्याची जमेची बाजू आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन तालुका पुढे नेला आहे. कार्यक्षम व्यक्तींना संधी दिली आहे. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात युवकांना व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. सर्वांग सुंदर तालुका निर्मितीचे श्रेय हे लोकनेते बाळासाहेब थोरात यांना असून या नेतृत्वाचा 2024 मध्ये अनपेक्षित झालेला पराभव हा महाराष्ट्रासाठी मोठा चटका लावणारा ठरला. अनपेक्षित सर्व घडले होते परंतु लोकनेते बाळासाहेब थोरात हे थांबले नाही. ते आजही सातत्याने जनतेमध्ये आहेत. तरुणाई साहेबांच्या पाठीशी एकवटली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राज्यातून सर्वाधिक मतांनी संगमनेर नगरपालिकेत जनतेने थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांना मोठे यश दिले. साहित्य,कला, नवनिर्मिती, वाचन या सर्व क्षेत्रांची आवड असणाऱ्या लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम स्व.यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जोपासला आहे. ज्येष्ठांचा सन्मान करून तरुणांना प्रोत्साहन दिले आहे. तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाशी नाळ जोडून ठेवताना प्रत्येकाच्या सुख – दुःखात ते सहभागी होत आहे. आणि म्हणून त्यांनी दिलेली एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्यामध्ये आदर्शवत ठरली आहे. आजही तोच रुबाब, तीच गर्दी, तोच आदर, तोच मान – सन्मान, टिकून आहे. येणारा काळ हा थोरात साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला दिशा देणारा ठरणार आहे.
- संगमनेर तालुका व शहर प्रगतशील बनवणाऱ्या या विकासाच्या महानायक असलेल्या नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा …

